मंगलवार, 5 जनवरी 2016

मी कोण ? நான் யார் ?

॥ ॐ नमो भगवते श्रीरमणाय ॥
मी कोण ?
நான் யார்

--
ज्या अर्थी दुःखविरहित अखंड सुखाची प्रत्येक प्राणिमात्रास इच्छा आहे, तसेच ज्याअर्थी प्रत्येकाला स्वतःबद्दल नितांत प्रेम आहे असे दिसून येते, आणि ज्याअर्थी केवळ सुख हेंच प्रेमाचे कारण आहे, ज्याअर्थी मनोविहीन निद्रावस्थेत, ज्या सुखाचा प्रत्येकाला अनुभव येतो त्या आत्मस्वरूपाच्या सुखाचा लाभ घडण्यास प्रत्येकाने आपले स्वरूप ओळखणे अगत्याचे आहे, त्यासाठी ’मी कोण’ अशा स्वरूपाची विचारणा हे प्रमुख साधन आहे ।
--
प्र. : 1.मी कोण?
उ. : सप्तधातूंचे बनलेले हे स्थूल शरीर मी नव्हें ; शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पाच विषयांचे ज्ञान करून देणारीं श्रोत्रेन्द्रिय, स्पर्शेंद्रिय, दृगिंद्रिय, जिह्वेंद्रिय, व घ्राणेंद्रिय ही पाच ज्ञानेंद्रिये मी नव्हे । बोलणे, हालचाल करणे, ग्रहण करणे, मलमूत्रादी विसर्जन करणे आणि उपभोग घेणे या क्रिया अनुक्रमे करणारी वाणी, पाय, हात, गुद, आणि उपस्थ (म्ह. जननेंद्रिय) ही पाच कर्मेंद्रिये मी नव्हे; विचार करणारे मन ही मी नव्हे; विषयांचे शेष संस्कार मात्र धारण करणारे विषयशून्य व क्रियाशून्य अज्ञानही मी नव्हे ।
प्र. : 2. जर यांपैकी काही मी नाही, तर मी कोण ?
उ. : वर उल्लेखलेल्या सर्वांचे ’हे नाही’, ’हे नाही’ असे निराकरण केल्यावर जी केवळ ज्ञप्ती (अहंस्फूर्ती) उरते, ती मी आहे ।
प्र. : 3. ज्ञप्तीचे स्वरूप काय आहे ?
उ. : सत्-चित्-आनंद हे ज्ञप्तीचे स्वरूप आहे ।
प्र. : 4. आत्मस्वरूपाचा लाभ केव्हा होईल ?
उ. : जेव्हा दृश्य जग दिसेनासे होईल, तेव्हा साक्षी जो आत्मा त्याच्या स्वरूपाची अनुभूती येईल ।
प्र. : 5. जग हे (सत्य म्हणून) भासत असतानाही स्वरूप साक्षात्कार होणार नाही काय ?
उ. : नाही होणार ।
प्र. : 6. : का ?
उ. : द्रष्टा आणि दृश्य वस्तू ही दोरी आणि साप यांसारखी आहेत । ज्याप्रमाणे आभासात्मक सापाच्या मिथ्या ज्ञानाचा लोप झाल्याशिवाय आधारभूत दोरीचे ज्ञान होणार नाही, त्याप्रमाणे जग हे सत्य आहे, या समजुतीचे निराकरण झाल्याशिवाय आधारभूत आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होणार नाही ।
प्र. : 7. दृश्य विषय असलेल्या जगाचा लोप केव्हा होईल ?
उ. : सर्व प्रकारचे विज्ञ्न व सर्व क्रिया यांचे कारण असलेले मन जेव्हा प्रशांत बनेल, तेव्हा जगाचा लोप होईल ।
प्र. : 8. मनाचे स्वरूप काय आहे ?
उ. : जिला मन म्हणतात, ती आत्मस्वरूपात राहणारी एक अद्भूत् शक्ती आहे । तिच्यामुळे सर्व प्रकारचे विचार (वृत्ती) उठतात । विचारांहून वेगळी मन अशी दुसरी वस्तू नाही । गाढ झोपेत विचार नसतात आणि जगही नसते । जागृती आणि स्वप्न या दोन अवस्थांत विचार असतात आणि जगही असते । ज्या प्रमाणे एखादा कोळी स्वतःमधून (जाळ्याचे) तंतू बाहेर काढतो आणि पुन्हा स्वतःत ओढून घेतो, त्याप्रमाणे मन स्वतःतून जग निर्माण करते आणि पुन्हा स्वतःतच विलीन करते । जेव्हा मन त्मस्वरूपातून बाहेर निघते, तेव्हा जग दिसते । म्हणून जेव्हा जग (सत्य म्हणून) दिसते, तेव्हा आत्मस्वरूप दिसत नाही; आणि जेव्हा आत्मस्वरूप दिसते (म्ह. प्रकाशते), तेव्हा जग दिसत नाही । जेव्हा मनाच्या स्वरूपाचा शोध एखादा मनुष्य सातत्याने घेतो, तेव्हा मन मरते आणि आत्मस्वरूप तेवढे उरते । ज्याला ’स्वरूप’ असे म्हणतात, तो आत्माच होय । मन नेहमी कोणत्या तरी स्थूल पदार्थावर अवलंबून राहते । ते एकाकी राहू शकत नाही । मनालाच ’सूक्ष्म शरीर’ किंवा ’जीव’ असे म्हणतात ।
प्र. : 9. मनाचे स्वरूप जाणण्याचा विचारमार्ग (Path of Enquiry) कोणता ?
उ. : या शरीरात ’मी’ असा जो विचार उठतो ते मन होय । शरीरात ’मी’ हा विचार कुठून उठतो, याचा जर एखाद्याने शोध घेतला, तर तो हृदयात उठतो, असे त्याला आढळून येईल । तेच मनाचे उत्पत्तिस्थान होय । ’मी’ ’मी’ असाही जरी एखाद्याने सतत विचार केला, तरी तो त्याच ठिकाणी पोहोचेल । मनात उठणार्‍या विचारात ’मी’ हा विचार पहिला आहे । हा उठल्यावरच इतर विचार उठतात । प्रथम(उत्तम)पुरुषवाचक / (अस्मद्) सर्वनामानंतरच द्वितीय(मध्यम)पुरुषवाचक / (युष्मद्) व तृतीय(अन्य)पुरुषवाचक (तत्) सर्वनामे अस्तित्वात येतात । प्रथमपुरुषवाचक सर्वनामाशिवाय द्वितीय व तृतीयपुरुषवाचक सर्वनामे असू शकणार नाहीत ।
प्र. : 10. मन कसे प्रशांत होईल ?
उ. : ’मी कोण?’ या विवेकाने । ’मी कोण’ हा विचार इतर सर्व विचारांचा नाश करील, आणि पेटणार्‍या चितेला हलवून अधिक प्रज्वलित करण्यास वापरलेल्या काठीप्रमाणे, तोही विचार शेवटी नष्ट होईल । मग आत्मस्वरूपाची अनुभूती येईल ।
प्र. : 11. ’मी कोण’ या विचाराशी अखंड एकनिष्ठ राहण्याचा उपाय कोणता ?
उ. : इतर विचार उठले असताना आपण त्यांच्या पाठोपाठ जाऊ नये ; तर असा शोध घ्यावा की, ’हे (विचार) कुणाला येत आहेत ? ’किती विचार उठतात ? हा प्रश्न महत्वाचा नाही । जसजसा एकेक विचार उठेल, तसतसा चिकाटीने आपण शोध घ्यावा की, ’हा विचार कुणाला आला आहे ? ’यावरा ’मला’ असे उत्तर येईल ।त्यावर जर असा प्रश्न केला की, ’मी कोण?’ तर मन आपल्या उगमाकडे परत फिरेल ; आणि उठलेला विचार लोप पावेल । या सतत अभ्यासाने मनाला आपल्या उगमस्थानी स्थिरावण्याची कला साधेल । जेव्हा सूक्ष्म मन मेंदू आणि इंद्रिये यांमधून बाहेर पडते, तेव्हा स्थूल नामरूपे दिसू लागतात । मनाला बाहेर पडू न देता, हृदयात स्वस्थ करण्याच्या प्रक्रियेला ’अन्तर्मुखता’ असे म्हणतात ; व बाहेर जाऊ देण्याच्या प्रक्रियेला ’बहिर्मुखता’ असे म्हणतात । अशा रीतिने जेव्हा मन हृदयात स्वस्थ होते, तेव्हा ’मी’ हे विचारकेंद्र लोप पावते ; आणि अखंड असणारा आत्मा प्रकाशात राहतो । कोणतीही गोष्ट करताना माणसाने ’मी करतो’ या अहंकारास थारा न देता ती करावी । माणूस जर असा वागेल, तर सर्व शिवस्वरूप (ईश्वरस्वरूप) असल्याचे त्याला दिसेल ।
प्र. : 12. मन प्रशांत करण्यास दुसरे उपाय नाहीत काय ?
उ. : विवेका (enquiry) शिवाय इतर प्रभावी उपाय नाहीत । इतर उपायांनी मन ताब्यात आणण्याचा प्रयत्नकेल्यास ते ताब्यात आल्या सारखे वाटेल ; पण पुन्हा ते बाहेर जाईल । प्राणायामानेही मन निश्चल राहील । मन आणि प्राण या दोहोंचे मूळ एकच आहे । वस्तुतः विचार हे मनाचे स्वरूप आहे । ’मी’ हा विचार मनाचा पहिला विचार आहे ; आणि तोच अहंकार होय । जेथून अहंकार निघतो तेथूनच प्राणही निघतो म्हणून जेव्हा मन प्रशांत बनते, तेव्हा प्राणायाम होतो ; आणि जेव्हा प्राणायाम होतो, तेव्हा मन प्रशांत बनते । गाढ झोपेत मात्र जरी मन प्रशांत असते, तरी प्राणाचे स्पंदन थांबत नाही ।देहाचे रक्षण व्हावे आणि इतर लोकांना तो मृत झाला आहे असे वाटू नये, या हेतूने ईश्वरी इच्छेनुसारच हे सारे घडत असते । जागृतावस्थेत व समाधीत मन प्रशांत बनले असता, प्राणायाम होतो । प्राण हे मनाचे स्थूल रूप आहे । मरणकाळ येईपर्यंत मन प्राणाला देहात राहू देते ; आणि देह मृत्य्मुखी पडतो तेव्हा मन आपल्याबरोबर प्राणाला घेऊन जाते । म्हणून प्राणायामाचा अभ्यास हे मनोनिग्रहाचे केवळ एक साधन आहे । त्यामुळे मनोनाश होणार नाही ।
प्राणायामासारखी परमेश्वराचे मूर्तिध्यान, मंत्रजप, उपवास इत्यादी मन प्रशांत करण्याची केवळ साहाय्यक साधने होत ।
  परमेश्वराच्या मूर्तिध्यानाने आणि मंत्रजपाने मन एकाग्र बनते । सतत भटकत राहणे हा मनाचा धर्म आहे । ज्याप्रमाणे हत्तीला सोंडेत धरण्यासाठी साखळी दिली असता, ती तो सतत पड़ून ठेवील : दूसरे काही पकडणार नाही ; त्याप्रमाणे नामरूपांत गुंतून राहिलेले मन केवळ त्यांचेच ग्रहण करीत राहील, जेव्हा मन असंख्य विचारांच्या रूपाने फाकते, तेव्हा प्रत्येक विचार दुबळा बनतो ; पण जसजसे विचार लोप पावतात, तसतसे मन एकाग्र व समर्थ बनते । अशा मनाला आत्मविचार सोपा वाटेल । सर्व नियमांत सात्त्विक व मित आहाराचा नियम उत्कृष्ट आहे । या नियमाचे पालन केल्यास मनाचा सत्त्वगुण वाढेल आणि ते आत्मविचारास साहाय्यक बनेल ।
प्र. : 13. विषयाचे शेष संस्कार (म्ह. संकल्प) समुद्राच्या लाटांप्रमाणे अनंत दिसतात । त्या सर्वांचा निरास केव्हा होईल ?
उ. : जसजसे आत्मस्वरूपाचे ध्यान अधिकाधिक वरच्या पातळीवर जाईल, तसतसे विचार नष्ट होत जातील ।
प्र. : 14. जणू अनादी कालापासून चालत आलेले विषयांचे शेष संस्कार नष्ट होणे आणि शुद्ध आत्मस्वरूपात राहणे माणसाला शक्य आहे काय ?
उ. : ’हे शक्य आहे की नाही ?’ अशा संशयाच्या आहारी न जाता माणसाने चिकाटीने आत्मस्वरूपाचे ध्यान करीत जावे । एखादा मनुष्य मोठा पापी असला, तरी त्याने "अरेरे ! मी पापी आहे। मी कसा वाचणार ?" म्हणून चिंता करत रडत बसू नये । "मी पापी आहे" हा विचार त्याने संपूर्णपणे सोडून द्यावा आणि स्वरूपानुसंधानाकडे दक्षतेने लक्ष द्यावे, म्हणजे त्याला निश्चित यश मिळेल । एक चांगले आणि दुसरे वाईट, अशी दोन मने नाहीत । मन एकच आहे । वासनांचे शेष संस्कार दोन प्रकारचे असतात : पवित्र आणि अपवित्र । जेव्हा मन पवित्र संस्कारांनी प्रभावित झालेले असते, तेव्हा त्याला ’चांगले’ म्हणतात ; आणि जेव्हा अपवित्र संस्कारांचा पगडा त्याच्यावर बसलेला असतो, तेव्हा त्याला ’वाईट’ म्हणतात ।
सांसारिक विषयांत आणि दुसर्‍या लोकांच्या व्यवहारात मनाला भटकू देऊ नये । आसक्ती आणि द्वेष या दोहोंचाही त्याग करावा । जे आपण दुसर्‍यास देतो, ते वस्तुतः आपण स्वतःसच देत असतो । या सत्याचा जर उमज पडला, तर कोण बरे दुसर्‍यास देणार नाही ? जेव्हा आपला ’मी’ उठतो, तेव्हा सर्व काही उठते । जेव्हा तो ’मी’ शांत होतो तेव्हा सर्व काही शांत होते । जितक्या प्रमाणात आपण नम्रतेने वागू, तितक्या प्रमाणात आपले हित होईल । मन शांत केले म्हणजे माणूस कुठेही राहिला तरी चालेल ।
प्र. : 15. विचारणेचा अभ्यास कुठवर करावा ?
उ. : जोपर्यंत विषयांचे संस्कार मनात आहेत, तोपर्यंत ’मी कोण ?’ अशी विचारणा करणे आवश्यक आहे । जसे विचार उठतील, तसे ते तिथल्या तिथे त्यांच्या उगमस्थानातच आत्मविचाराने नाहीसे करावे । आत्मज्ञान होईपर्यंत जरी अखंड आत्मानुसंधान करीत राहिले, तरी तेवढ्यानेही काम भागेल । जोवर किल्ल्यात शत्रू आहेत, तोवर ते हल्ला करणारच । जसजसे ते बाहेर पडतील, तसतसा त्यांचा निःपात केला, तर किल्ला आपल्या हाती येईल ।
प्र. : 16. आत्म्याचे स्वरूप कोणते ?
उ. : वस्तुतः जे आहे ते सर्व आत्माच आहे । शिंपीत जसा रुप्याचा भास होतो, तसे आत्मस्वरूपात जग, जीवात्मा आणि
ईश्वर याँचे भास होतात । ही त्रयी एकाच वेळी प्रकट होते आणि एकाच वेळी लोप पावते ।
    ’मी’ या विचाराचा संपूर्ण अभाव हेच आत्मस्वरूप । त्याला ’मौन’ असे म्हणतात । हे आत्मस्वरूप स्वतः जग असते ; तेच स्वतः ’मी’ असते, सर्व काही शिव, आत्मस्वरूप असते ।
प्र. : 17. प्रत्येक गोष्ट ईश्वरनिर्मित नाही काय ?
उ. : इच्छा, निश्चय किंवा प्रयत्न यांशिवाय सूर्य उगवतो । आणि केवळ त्याच्या अस्तित्वामुळे सूर्यकांत मणी आग बाहेर टाकतो , कमळ् उमलते। पाण्याचे बाष्प बनते ; लोक आपापली विविध कर्तव्ये करतात आणि नंतर विशांती एतात । ज्याप्रमाणे लोहचुंबकाच्या अस्तित्वामुळे सुई फिरते, त्याप्रमाणे परमेश्वराच्या केवळ अस्तित्वामुळे सृष्ट्यादी विविध (वैश्विक) कृत्यांच्या किंवा दैवी पंचकर्मांच्या आधीन होऊन जीव कर्मानुसार आपापली कर्तव्ये पार पाडतात आणि शेवटी निवृत्त होतात । परमेश्वराला कसलाच संकल्प नसतो ; कसल्याच कर्माने तो लिप्त होत नाही । लौकिक कर्मांचा ज्याप्रमाणे सूर्यावर काहीच परिणाम होत नाही, किंवा इतर चार महाभुतांचे गुणदोष ज्याप्रमाणे सर्वव्यापक आकाशा (ether) वर कसलाच परिणाम करीत नाहीत, त्याप्रमाने हे होते ।
प्र. : 18. भक्तात सर्वश्रेष्ठ कोणता ?
उ. : जो आत्मरूपाल म्हणजे परमेश्वराला आपले सर्वस्व समर्पन करतो, तो सर्वोत्कृष्ट भक्त होय । परमेश्वराला आपले सर्वस्व अर्पण करणे म्हणजे आत्मस्वरूपाखेरीज दुसर्‍या कुठल्याही विचाराला वाव न देता, अखंड आत्मस्थितीत राहणे ।
परमेश्वरावर जेवढे ओझे आपण टाकू तेवढे तो वाहतो । सर्व वस्तुमात्राला चालना देणारी भगवच्छक्ती असताना, आपण तिला शरण न जाता ’काय करावे व कसे करावे? काय करू नये व कसे करू नये ?’ असल्या विचारांनी सतत का सचिंत व्हावे ? आगगाडी सारे ओझे वाहून नेते हे माहीत असताना, आत चढल्यावर, गाडीत ते ठेवून स्वस्थ राहण्याऐवजी, आपले बोचके आपल्याच डोक्यावर कष्टाने का वहावे ?
प्र. : 19. वैराग्य म्हणजे काय ?
उ. : जसजसे विचार उठतील, तसतसे त्यांना समूळ पूर्णपणे उखडून टाकून नाहीसे करणे वैराग्य होय । ज्याप्रमाणे मोतीबुड्या (पर्ल-डाइव्हर) आपल्या कंबरेस दगड बांधून समुद्राच्या तळाशी बुडी मारतो आणि तिथले मोती वेचून घेतो, त्याप्रमाणे आपण प्रत्येकाने वैराग्य पाठीशी घेऊन स्वतःतच खोल बुडी घ्यावी आणि आत्ममोत्याचा लाभ करून घ्यावा ।
प्र. : 20. परमेश्वर आणि गुरू यांना जीवाला मोक्ष मिळवून देता येणार नाही काय ?
उ. : परमेश्वर आणि गुरू केवळ मोक्षाचा मार्ग दाखवतील, ते आपणहून जीवाला मोक्षस्थितीप्रत घेऊन जाणार नाहीत । वस्तुतः परमेश्वर आणि गुरू भिन्न नाहीत । वाघाच्या जबड्यात सापडलेल्या भक्ष्याला जशी सुटका नाही, तद्वत् जे कोणी गुरूच्या करुणामय दृष्टीच्या टप्प्यात आले, त्यांची त्यतून सुटका न होता त्यांचे रक्षणच गुरुकडून होईल । तथापि प्रत्येकाने स्वतः प्रयत्नशील राहून परमेश्वराने किंवा गुरूने दाखविलेला मार्ग चोखाळणे आणि मोक्षाची अनुभूति घेणे आवश्यक आहे । आपल्या स्वतःच्याच ज्ञानदृष्टीने आपण स्वतःला ओळखू शकू, दुसर्‍याच्या नव्हे ; स्वतः रामाने ’मी राम आहे’ असे स्वतःला ओळखण्यासाठी आरशाची मदद घेणे आवश्यक आहे काय ?
प्र. : 21. मुमुक्षूने (प्रपंच) तत्त्वांचा शोध घेणे आवश्यक आहे काय ?
उ. : ज्याला खरकटे अन्न टाकून द्यावयाचे आहे, त्याला त्याचे पृथःकरण करून ते कशास्वरूपाचे आहे, हे पाहण्याची जशी गरज नसते, तसेच ज्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान करून घ्यायचे आहे, त्याने असल्या तत्त्वसंख्येची गणना करणे, किंवा त्यांच्या गुणविशेषांचा शोध घेणे याची आवश्यकता नसते । आत्मस्वरूपाला झाकून टाकणार्‍या प्रपंचतत्त्वांच सर्वस्वी त्याग करावा लागतो । प्रपंच हा स्वप्नवत् आहे असे त्याने मानावे ।
प्र. : 22. जागृती व स्वप्न यांत काही फरक नाही काय ?
उ. : जागृती दीर्घ असते । याहून दुसरा फरक नाही । जागृतीतल्या घटना जागे असेतोवर जशा खर्‍या वाटतात, तशाच स्वप्नातल्याही स्वप्न असेतोवर खर्‍या वाटतात
 स्वप्नात मन हे एक वेगळे शरीर धारण करते । जागृती व स्वप्न या दोन्ही अवस्थांत विचार, नामे व रूपे एकाच वेळी प्रका होतात ।
प्र. : 23. मुमुक्षूंना ग्रंथवाचनाचा काही उपयोग आहे काय ?
उ. : सर्वग्रंथ संगतात की, मुक्ती मिळविण्यासाठी मन निवांत केले पाहिजे । म्हणून मन निवांत करणे हेच त्यांच्या शिकवणीचे सार आहे । एकदा हे समजले की, अखंड वाचन करण्याची गरज नाही । मन प्रशांत करण्यासाठी ’मी कोण?’ असा अंतःशोध माणसाने स्वतःत घ्यायचा असतो । हा शोधग्रंथांत कसा घेता येईल ? आपल्या स्वतःच्या ज्ञानदृष्टीने आपणास आपण पहावे । आपले स्वरूप पंचकोशांच्या आत आहे । ग्रंथ मात्र त्यांच्या बाहेर आहेत । या पंचकोशांना दूर सारून ज्याअर्थी आत्मस्वरूपाचा शोध घ्यावयाचा असतो, त्याअर्थी ग्रंथांत ते शोधणे व्यर्थ आहे । अशी एक वेळ येईल की, जेव्हा माणसाला सारे ज्ञान विसरावे लागेल ।
प्र. : 24. सुख म्हणजे काय ?
उ. : सुख हा आत्मस्वरूपाचा स्वभावच आहे । सुख आणि आत्मस्वरूप ही भिन्न नाहीत । प्रपंचातल्या कुठल्याही विषयात सुख नाही । अज्ञानानामुळे आपणास वाटते की, विषयापासून आपणास सुख मिळते । मन बहिर्मुख झाले की, ते दुःखी बनते । खरे पाहिले असता, जेव्हा त्यांच्या इच्छा पुर्‍या होतात, तेव्हा ते आपल्य् मूळस्थानी परतते आणि सुखाचा म्हणजे आत्मस्वरूपाचा आस्वाद घेते । त्याचप्रमाणे सुषुप्ती, समाधी, मूर्च्छां या अवस्थांत, तसेच इष्ट विषय मिळाला असता, किंवा अनिष्ट विषय दुरावला असता, मन अंतर्मुख होते आणि शुद्ध आत्मानंदाची गोडी चाखते अशा रीतिने मन कधी आत्मस्वरूपाबाहेर, तर कधी आत्मस्वरूपात असे अविश्रांत भटकत असते । झाडाखाली असता सावली सुखड असते । बाहेर उघड्या मैदानावर उन्हाचे चटके बसत असतात । उन्हात बाहेर हिंडणार्‍या माणसाला सावलीत आल्यावर थंड वाटते । सावलीतून उन्हात बाहेर पडणारा आणि पुन्हा सावलीकडे परतणारा मनुष्य मूर्ख होय । शहाणा माणूस कायमचा सावलीत राहतो । त्याच प्रमाणे ज्याने सत्यस्वरूप जाणले, त्याचे मन प्रपंचात घुटमळते । दुःखी बनते ; आणि सुखाचा आस्वद घेण्यासाठी थोडा वेळ ब्रह्मकडे परत येते । वस्तुतः प्रपंच, जग ज्याला म्हणतात, तो नुसता विचार आहे । जेव्हा प्रपंच मावळतो, म्हणजे विचार लुप्त होतो, तेव्हा मन सुखी होते । आणि जेव्हा प्रपंच समोर उभा ठकतो (अर्थात विचाररूपाने) तेव्हा ते दुःखी होते ।
प्र. : 25. ज्ञानदृष्टी म्हणजे काय ?
उ. : स्वस्थ राहणे याला ज्ञानदृष्टी म्हणतात । स्वस्थ राहणे म्हणजे मन आत्मस्वरूपात मुरविणे । दूर असलेल्या माणसांच्या विचारांचे अंतर्ज्ञान, त्रिकालज्ञान आणि दूरदर्शन म्हणजे ज्ञानदृष्टी नव्हे ।
प्र. : 26. निष्कामता (Desirelessness) आणि ज्ञान (wisdom) यांचा काय परस्पर संबंध आहे ?
उ. : निष्कामता म्हणजेच ज्ञान, या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत ; त्या एकच आहेत । मनाची विषयाकडे असलेली धाव थांबविणे म्हणजेच निष्कामता । कोणत्याही विषयाचे ब्रह्महून वेगळे भान नसणे म्हणजे ज्ञान । वेगळ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, आत्मस्वरूपाखेरीज दुसर्‍या कशाचीही इच्छा नसणे  म्हणजे विराग्य किंवा निष्कामता । आत्मस्वरूपाला न सोडणे म्हणजे ज्ञान ।
प्र. : 27. विचारणा (Enquiry) आणि ध्यान (Meditation) यांत काय फरक आहे ?
उ. : मन आत्मस्वरूपात स्थिर करणे म्हणजे विचारणा । ’मी ब्रह्म, सत्-चित्- आनंद आहे’ असे चिंतन हे ध्यान ।
प्र. : 28. मोक्ष म्हणजे काय ?
उ. : ’बद्ध असा मी कोण ?’ असा आपल्या स्वरूपाचा शोध घेणे आणि त्या सत्यस्वरूपाचा साक्षात्कार होणे म्हणजे मोक्ष ।
॥श्रीरमणार्पणमस्तु ॥
--
(ग्रंथाचे श्रीयुत गंगाधर विट्ठल कुलकुर्णीकृत भावानुवाद)
--
प्रकाशक : टी.एन.वेंकटरमण,
अध्यक्ष,
श्रीरमणाश्रमम्
तिरुवण्णामलै
(दक्षिण भारत)
606603.
दुसरी आवृत्ती : जुलै 1986
--
Disclaimer :
The only motive and purpose of this post is to make available the Marathi Translation of
(நான் யார்) 
for the benefit of those Marathi speaking readers who would like to see the Teachings of Sri Ramana Maharshi in their own language.